
भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’भाई याला अखेर अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक केली. त्याला बीडमध्ये आणण्याची तयारी सुरू असतानाच आता यावर सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधीमंडळात उपस्थित राहिलेल्या सुरेश धस यांना माध्यम प्रतिनिधींनी सतीश भोसले यांच्या अटकेबाबत विचारले. यावेळी ते म्हणाले की, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने चूक केली असून त्या संदर्भात त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. तसेच त्याने चूक केली असेल तर कारवाई करा, असे मी आधीही म्हणालो आहे, असेही ते म्हणाले.
शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीस अमानुष मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांचा हा लाडका कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याभाई प्रकाशझोतात आला होता. दहशतीपोटी कोणीही तक्रार देण्यास धजावत नसल्यामुळे शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतःहून फिर्याद देत सतीश भोसलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लगेचच या खोक्याभाईचा दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
हे वाचा – आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद
दरम्यान, हा खोक्याभाई हरीण, काळवीट, ससे, मोरांची शिकार करण्यात पारंगत असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला. या खोक्याभाईच्या घरावर वन विभागाने धाडही टाकली होती. खोक्याभाईच्या घरावर टाकलेल्या धाडीत वन विभागाला शिकारीचे मोठे साहित्य सापडले होते. धारदार शस्त्र, वन्यजीव पकडण्याच्या जाळ्या, वाघूर आदींचा यात समावेश होता. यावेळी शिकार केलेल्या प्राण्यांचे वाळलेले मांसही तिथे आढळून आले होते.
दरम्यान, खोक्याभाईसोबत सुरेश धस यांचे अनेक फोटोही समोर येत असतानाच एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. या खोक्याभाईला सुरेश धस यांचा 100 टक्के आशीर्वाद आहे. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी स्वत: सतीश भोसले याला फोन केल्याचे आणि ते त्याला खोक्या बोलत असल्याचे यातून समोर आले आहे.
Satish Bhosale news – बीडच्या खोक्याभाईला सुरेश धस यांचा 100 टक्के आशीर्वाद, ऑडिओ क्लिप व्हायरल