Kajol Devgan- काजोलने गोरेगावमध्ये खरेदी केली आलिशान मालमत्ता, वाचा मालमत्तेचा दर आणि ठळक वैशिष्ट्ये

अभिनेत्री काजोलने नुकतीच गोरेगावमध्ये एक आलिशान मालमत्ता खरेदी केलेली आहे. बाॅलीवूडच्या कलाकारांसाठी कोणतीही मालमत्ता खरेदी करणं हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जातो. खासकरून हिंदुस्थानबाहेर खरेदी केलेली मालमत्ता बाॅलीवूड सेलिब्रिटींसाठी स्टेटसचा मुद्दा ठरते. मुंबईतील अनेक प्रतिष्ठित ठिकाणी बाॅलीवूडच्या सेलिब्रिटींनी गुंतवणूक म्हणून कार्यालये तसेच घरे घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात. सेलिब्रिटी ज्याठिकाणी घर किंवा कार्यालये घेतात त्या जागांचे भाव हे कायमच गगनाला भिडलेले पाहायला मिळतात.

 

अभिनेत्री काजोल हिने नुकतीच गोरेगावमधील प्रतिष्ठित ‘सिग्नेचर टाॅवर’मध्ये एक मालमत्ता खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन, सारा अली खान, कार्तिक आर्यन यांचीही मालमत्ता याच इमारतीमध्ये असून, या इमारतीमध्ये बहुतांशी उद्योगधंद्यासाठीच मालमत्ता खरेदी करण्याचा सेलिब्रिटींचा हेतू असतो. सिग्नेचर टाॅवर हे अतिशय प्रतिष्टित वस्तीमध्ये मोडले जाते, त्यामुळे याठिकाणचे जागांचे दरही कायम चढे असल्याचे दिसून आले आहे.

खरेदी केलेली ही मालमत्ता 29 करोडोंची असून, 4 हजार 365 इतके या जागेचे क्षेत्रफळ आहे. सदर मालमत्तेचा प्रति चौरस फूट दर हा 66 हजारांच्या घरात आहे. काजोलने घेतलेल्या या मालमत्तेमध्ये पाच गाड्या पार्क होतील अशी सुसज्ज पार्किंसाठी जागा आहे.

सदर मालमत्तेसाठी काजोलने अदमासे 2 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. चालू महिन्यातील ५ मार्चला याची महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयामध्ये नोंदणी प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. याआधी 2023 मध्ये काजोलने अंधेरी पश्चिमेतील ओशीवरामध्ये कार्यालयासाठी  8 कोटींमध्ये 195 चौरस क्षेत्रफळ जागा खरेदी केली होती.