Hibiscus Flower Face Pack- जास्वंदीच्या फुलाचे फेस पॅक त्वचेला देतील नैसर्गिक ग्लो, साध्या सोप्या घरगुती उपायांनी त्वचेला मिळतील खूप फायदे

गणपतीला आवडणारे फूल म्हणून जास्वंदीच्या फुलाचा मान हा केवळ धार्मिक कार्यापुरता उपयोगी नाही. तर जास्वंदीच्या फुलांचे असंख्य उपयोग सौंदर्यासाठीही तितकेच महत्त्वाचे मानले जातात. जास्वंदीच्या फुलापासून विविध तेलं बनवून केसांच्या वाढीसाठी वापरले जातात. जास्वंदीचे तेल हे केसवाढीसाठी खूप उपयुक्त मानले जाते. त्याच जास्वंदीच्या फुलापासून आपण आज फेस पॅक कसे करायचे ते बघणार आहोत. जास्वंदीच्या फेस पॅकमुळे त्वचेला तजेला तर मिळतोच, त्या व्यतिरीक्त इतर खूप सारे फायदे मिळतात. जास्वंदीपासून फेस मास्क बनवणे हे नुसते सोपे नाही तर, हा कमी खर्चिक सुद्धा आहे. त्यामुळे हे जास्वंदीचे फेस पॅक तुमच्या सौंदर्यात नक्कीच चार चांद लावतील यात वाद नाही.

जास्वंदाचे फेस मास्क कसे करावे?  

जास्वंद फूल आणि दही फेस पॅक

जास्वंदाचे फूल आणि दही एकत्र करुन त्यांची पेस्ट बनवावी. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे त्यानंतर किमान दहा मिनिटांनी चेहरा धुवावा.

उन्हाळ्यात आपल्या त्वचेवर काळेपणा खूप मोठ्या प्रमाणात होतो. यावर प्रभावी उपाय म्हणून हा फेस पॅक वापरणे हितावह आहे. तसेच जास्वंद आपल्या चेहऱ्यासाठी नैसर्गिक माॅइश्चराइजर म्हणूनही काम करते. यामुळेच आपल्या त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.

जास्वंद फूल आणि लव्हेंडर तेल

जास्वंद फुलाची पावडर एक चमचा, दोन चमचे दही, दोन ते तीन थेंब लव्हेंडर तेल हे सर्व मिश्रण एकत्र करुन चेहऱ्यास लावावे. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवावा.

जास्वंद आणि लव्हेंडर तेलाचा हा फेस पॅक मुरूमांसाठी खूपच उपयुक्त मानला जातो. मुरूमांवर प्रभावी उपाय म्हणून हा फेस पॅक नियमित लावल्यास, पटकन फरक जाणवून येईल.

जास्वंद फूल आणि मध

एक चमचा जास्वंद फुलाची पेस्ट, एक चमचा मध घ्यावा. मध आणि जास्वंद फुलाची पेस्ट नीट मिक्स करुन, ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा.

या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी जाऊन चेहऱ्यावर नैसर्गिक ओलावा टिकून राहिल.

Hibiscus Flower- जास्वंदीचे फूल फक्त केसांसाठी नाही तर, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठीही उपयुक्त!

 

 

जास्वंद फूल आणि कोरफड जेल

जास्वंद फूल आणि कोरफड गर घ्यावा. तुमच्याकडे कोरफड जेल असेल तर उत्तम. फूल आणि गर दोन्ही व्यवस्थित मिक्स करुन चेहऱ्यावर लावावा. किमान पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवावा.

हा फेसपॅक चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी खूप परीणामकारक मानला जातो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)