
वनखात्याकडून आवश्यक असणारी परवानगी मिळाली नसल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले असल्याचे वास्तव समोर आले आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता पावसाळ्यापूर्वी ते होणे शक्य नसल्याने या घाट रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरणाचा मुलामा देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.
गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रीटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वनखात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागाने माहिती मागवली आहे. या सगळ्या प्रक्रियेस लागणारा विलंब लक्षात घेता तूर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा पर्याय असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
रात्री नऊनंतर अवजड वाहनांना प्रवेश
पावसाळ्याच्या काळामध्ये अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी. मुंबई आणि नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांविषयी समन्वय साधून त्यांचे नियंत्रण करण्यात यावे, अशी सूचना ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी आज केली. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने चर्चा करून निर्णय घ्यावा असे आयुक्त राव यांनी सांगितले.