पोलीस डायरी – गँगवॉर संपले, गावगुंड वाढले !

>> प्रभाकर पवार

मस्साजोग गावचे संतोष पंडितराव देशमुख हे पदवीधर सरपंच बीड जिल्ह्यात लोकप्रिय होते. स्वतः देशमुख व त्यांची पत्नी अश्विनी अशा या दोघांनी सलग 15 वर्षे मस्साजोगचे सरपंच म्हणून कालपर्यंत काम केले होते. या कालावधीत त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘हिरवाळी आदी विविध सरकारी योजना राबवून लोकांना न्याय देण्याचा, तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. देशमुख यांनी बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून उद्योजकांना सहकार्य करण्याचे, गावगुंडांपासून त्यांचे संरक्षण करण्याचे धोरण सुरू ठेवले होते त्यामुळे संतोष देशमुख अल्पावधीतच बीड जिल्ह्यात लोकप्रिय झाले. याचा धसका बीड जिल्ह्यातील गावगुंडांनी घेतला. मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाचे खंडणीसाठी काम बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाल्मीक कराड या धनंजय मुंडे या मंत्र्यांच्या हस्तकाचेही संतोष देशमुख यांनी ऐकले नाही. काम बंद पाडून बेरोजगारी का वाढवता? असा सवाल देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या हस्तकांना केला तेव्हा वाल्मीक कराडचा हस्तक विष्णू चाटे हा संतोष देशमुख यांना धमकावत म्हणाला, “तू आमच्या आड येऊ नकोस. जर आम्हाला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी मिळाली नाही तर वाल्मीक तुला जिवंत सोडणार नाही. हे तू लक्षात ठेव” आणि तसेच घडले. विष्णू चाटेची धमकी खरी ठरली. मुंबईतील संघटित गुंडटोळ्यांपेक्षाही अत्यंत खतरनाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्यांच्या गावगुंडांनी 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे पिसेगाव येथून स्कॉर्पियो गाडीतून अपहरण केले व केज येथील चिंचोळी टाकळी येथे लोखंडी रॉड, गॅस पाईप, काठ्या आदी वस्तूंनी संतोष देशमुख यांच्यावर हल्ला केला दुपारी 3.30 ते 6.30 या 3 तासांत 6 आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर 56 वार केले त्यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. संतोष देशमुख यांच्या प्रत्येक अवयवाला आरोपी इजा करीत असताना संतोष देशमुख “मला मारू नका मला पाणी पाजा” अशा आर्तस्वरात याचना, विनवणी करीत होते. तेव्हा आरोपींनी पाण्याऐवजी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली.

खून करणारे आपण अनेक बघतो. परंतु इतक्या राक्षसी, अमानुषपणे एखाद्याला ठार मारणारे, प्रेतावर मुतणारे हैवान कधी कुणी पाहिले नसतील. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या छाताडावर नाचणाऱ्या आणि त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या सहा आरोपीसह सात आरोपींना अटक केली. त्यात या कटाचा प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड याचाही समावेश आहे, तर कृष्णा श्यामराव आंधळे हा आठवा आरोपी अद्याप फरार आहे. या सर्व आरोपींवर सीआयडीने ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण हळूहळू शांत होईल. ‘थंडे बस्ते में’ जाईल असे दिसते.

संतोष देशमुख या सुशिक्षित पदवीधर सरपंचाची हत्या झालीच नसती. ही क्रूर हत्या सरकारमान्य आहे. अटकेत असलेले सर्व आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. प्रत्येकावर एक-एक खून, खंडणी, अपहरण आदी गुन्हे आहेत. 6 डिसेंबर 2024 रोजी जेव्हा आरोपी अवादा कंपनीचा प्रकल्प बंद पाडायला गेले तेव्हा संतोष देशमुख यांनी पोलिसांची मदत घेऊन आरोपींना हाकलून लावले. त्याच दिवशी कामगारांना बेदम मारहाण करणाऱ्या वाल्मीक कराडच्या गुंडांवर मोक्काची कारवाई झाली असती तर ते आरोपी मोकाट सुटले नसते. आपल्याविरुद्ध संतोष देशमुख यांनी पोलीस कारवाई केली संतोष देशमुख आता आपणास जगायला देणार नाही, आपले खंडणींचे उत्पन्न बंद होईल या सुडापोटी आरोपींनी 9 डिसेंबरचा अपहरणाचा कट रचला. त्यात संतोष देशमुखांचा बळी गेला. याला जबाबदार गृहखाते व पोलीस आहेत. स्थानिक मंत्र्यांचा बचाव करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी संतोष देशमुखांचा बळी घेतला. संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांनाही हे भाजपचे राज्यकर्ते वाचवू शकले नाहीत याचा तमाम बीडवासीयांना खेद वाटत आहे. अटकेत असलेले सर्व आरोपी हे गंजारी समाजाचे आहेत. पोलिसांच्या एफआयआरमध्येच ‘जात-जमात’ अशी रकान्यात नोंद करण्यात आली आहे. देशमुख हे मराठा समाजाचे होते, परंतु वाल्मीक कराडच्या साथीदारांनी संतोष देशमुखांना खंडणी वसुलीत आडवे आले म्हणून ठार मारले. खंडणी वसुलीसाठी मंत्र्यांच्या बंगल्यात मीटिंग्ज झाल्या. मग वाल्मीक कराडच्या बॉसला सहआरोपी का करत नाही? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करीत आहेत त्यात तथ्य आहे. गावगुंडांचे म्होरके बरेचसे लोकप्रतिनिधी व राज्यकर्तेच आहेत.

मुंबई शहरातील गँगवॉर मुंबई क्राइम ब्रँचने संपविले, परंतु आता गावागावांत, जिल्ह्याजिल्ह्यांत गावगुंडांनी थैमान घातले आहे. त्याला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. 1992 च्या जे. जे. हत्याकांडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी दाऊदशी संबंधित आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, डॉक्टर, वकील, अगदी महिलांनाही जेलमध्ये टाकले होते, परंतु मित्रपक्षाच्या, मंत्र्यांच्या गुंडांनी आपल्या स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला ठेचून ठेचून मारले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ता टिकविण्यासाठी गप्प बसतात, मंत्र्यांवर कारवाई करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्याच्या अश्लील चित्रफिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखविणाऱ्या, त्याला प्रसिद्धी देणाऱ्या ‘लय भारी’च्या तुषार खरात या पत्रकारालाच जेलमध्ये टाकण्यात आले आहे अशा या सरकारबद्दल काय बोलणार? सामान्यांना भविष्यात जगणे कठीण होणार आहे, एवढे मात्र नक्की.