पीओपी बंदीविरोधात मूर्तिकारांचा आक्रोश, गणेशमूर्तीशाळांचे काम ठप्प

पीओपीबंदीच्या विरोधात राज्यभरातील मूर्तिकार आज परळच्या नरे पार्कमध्ये एकवटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पीओपीच्या मूर्तींवर बंदी आली आहे. मुंबई महापालिकेने माघी गणशोत्सवात या आदेशाची अंमलबजावणी केली. त्यानंतर आता भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवावर या बंदीचे सावट आहे. परिणामी राज्यभरातील शेकडो मूर्तिशाळांमध्ये काम ठप्प झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो मूर्तिकारांचा रोजगार हिरावला गेला आहे. याबद्दलचा आक्रोश आजच्या मूर्तिकार महासंमेलनात दिसून आला. मूर्तिकारांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात धाव घ्यायचे ठरवले आहे.

परळमध्ये मंगळवारी अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संमेलन झाले. यामध्ये श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य), हमरापूर गणेश उत्कर्ष मंडळ, महाराष्ट्र मूर्तिकला प्रतिष्ठानचे सुमारे 13 हजार मूर्तिकार, कामगार सहभागी झाले. शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ, लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी, तसेच परळचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी, उमरखाडी गणेशोत्सव मंडळ अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी सहभागी झाले. मुंबईतील गणेशोत्सव सुरू राहिला पाहिजे. समस्त मूर्तिकारांच्या पाठीशी उभे असल्याच्या भावना गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केल्या. शास्त्रज्ञ जयंत गाडगीळ यांनी पीओपी पर्यावरणपूरक असल्याचा दावा या वेळी केला. पीओपीवर सरसकट बंदी लागू करू नये, विसर्जनावर तोडगा काढावा, पीओपी पर्यावरणपूरक आहे, त्यासाठी शास्त्रीय आधार घ्यावा, यादृष्टीने आजच्या महासंमेलनात विचार मांडण्यात आले. सर्व कारखाने बंद असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई म्हणाले.

पाठपुरावा करणार

राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला याबाबत तज्ञ समिती गठीत करून सर्वंकष अभ्यास करण्याची विनंती केली आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी तज्ञ समिती गठीत करू अहवाल देण्यात येईल, असे कळवल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी महासंमेलनात सांगितले.

न्यायालयात जाणार

पीओपीबंदी संदर्भात पुढील सुनावणी 20 मार्च रोजी हायकोर्टात होणार आहे. त्याआधी मूर्तिकार संघटना आपली बाजू मांडणार आहेत. मूर्तिकार आता न्यायालयीन लढा देणार असल्याचे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी सांगितले.

सरकार तज्ञ समितीमार्फत अभ्यास करणार

पीओपीच्या गणेशमूर्ती वापराबाबत स्पष्टता यावी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ञ समितीमार्फत अभ्यास करणार आहे. याबाबत आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना विनंती करण्यात आली होती, असे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी उभे असून येत्या 20 तारखेला शासन न्यायालयात भूमिका मांडेल. त्यासाठी आवश्यक तज्ञ वकील शासन देईल, अशी ग्वाही शेलार यांनी दिली.