
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिले आहे. क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्प्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे 30 सैनिक ठार झाले असून 214 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यात सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. बलुचिस्तान प्रांतात बोलनमधील माशफाक बोगद्याजवळ हा हल्ला झाला असून लष्करी कारवाई केल्यास सर्व ओलिसांना ठार मारण्याची धमकी बीएलएने दिली.
आधी स्फोट, नंतर हल्ला
जाफर एक्प्रेस सकाळी 9 वाजता क्वेट्टा येथून पेशावरकडे निघाली होती. दुपारी 1च्या सुमारास माशफाक येथील बोगदा क्र. 8 जवळ रेल्वे रूळ स्फोटाने उडवण्यात आले. त्यामुळे जाफर एक्प्रेस घसरली. त्यानंतर बलूच आर्मीने ट्रेनवर हल्ला चढवला.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ड्युटीवर जात असलेले सैनिक, पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांचा ओलिसांमध्ये समावेश आहे. लहान मुले, महिला, बलुचिस्तानमधील सामान्य प्रवाशांना सोडून देण्यात आले आहे.
13 हल्लेखोरांना कंठस्नान
बलूच कैद्यांना 48 तासांच्या आत मुक्त करावे, अन्यथा सर्व ओलिसांना ठार मारले जाईल, असा अल्टिमेटम बलूच आर्मीने दिला आहे. पाकिस्तानी सैन्य एअर स्ट्राईक करण्याच्या तयारीत असून रात्री उशिरा बलूच आर्मीच्या 13 हल्लेखोरांना ठार मारण्यात आले आहे.