
हिंदुस्थानने अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, मात्र अमेरिकेला असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी संसदीय समितीला सांगून ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला. हिंदुस्थान आणि अमेरिकेत अद्याप चर्चा सुरू असून सध्या कोणताही व्यापार करार अंतिम झालेला नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेची दुसऱ्यांदा सूत्रे हाती आल्यापासून ट्रम्प यांनी आक्रमक निर्णयाचा धडाका लावला आहे. अलीकडेच त्यांनी युक्रेनला युरोपकडून मिळणाऱ्या निधीबाबत दावा केला होता, मात्र फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तो फेटाळून लावला होता. हिंदुस्थान सर्वाधिक आयात शुल्क आकारत असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी अनेकदा काढले आहेत. म्हणूनच जशास तसे उत्तर देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
व्यापार करारावर चर्चा सुरू
संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यावर चिंता व्यक्त केली होती. यावर बर्थवाल म्हणाले की, हिंदुस्थानने अमेरिकेला आयात शुल्क कमी करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही. ट्रम्प यांच्या दाव्यावर आणि माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांवर आधारित काहीही सांगता येत नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे.