लोकल ट्रेनवर फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही! पोलिसांची करडी नजर; रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार

होळी-धुळवडीला काही दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच लहान मुले व तरुणाईने रंगांची उधळण सुरू केली आहे. या उत्साहात रेल्वे मार्गाजवळील वस्त्यांतील मुलांकडून लोकल ट्रेनवर रंग मिसळलेल्या पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन व पोलीस सतर्क झाले आहेत. फुगे फेकणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष वॉच ठेवला असून रेल्वे प्रशासन संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे, माहीम, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, विरार तसेच मध्य रेल्वेवर शीव, कुर्ला, ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, कल्याण आणि हार्बरवर वडाळा, चुनाभट्टी, मानखुर्द, गोवंडी आदी स्थानकांच्या परिसरात लोकल ट्रेनवर फुगे मारण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याबाबत प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. तिन्ही रेल्वे मार्गावरील संवेदनशील भागांवर रेल्वे पोलिसांचा विशेष वॉच राहणार आहे. स्थानिक पोलीसही हे प्रकार रोखण्यासाठी दक्ष राहणार आहेत. काही ठिकाणी पोलीस तैनात राहणार आहेत. प्रवासी व स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींच्या आधारे तत्काळ कारवाई केली जाणार आहे. अशा घटनांत कुणाच्या जीविताला धोका निर्माण करणारी इजा पोहचल्यास फुगे फेकणाऱ्यांची थेट तुरुंगात रवानगी केली जाऊ शकते, असे रेल्वे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.