बंद गिरण्या सुरू करून हजारो कामगारांचे संसार वाचवा, अरविंद सावंत यांची मागणी

कोरोनाचे कारण देत बंद केलेल्या पोदार, टाटा आणि इंदू मिल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोळा हजारांवर कामगारांचे संसार वाचवा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.

मुंबईत काही वर्षांआधी तब्बल 54 मिल होत्या. यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे लाखो संसार या मिलवर अवलंबून होत्या, मात्र कालांतराने या मिल बंद पडत गेल्या. यामध्ये नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशनची पोदार, इंदू आणि टाटा मिलमध्ये काम करणारे तब्बल 16 हजार कामगारही रस्त्यावर आले. यातच कोरोना काळात या तीनही मिल बंद करण्यात आल्या, मात्र कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतरही या मिल सुरू झालेल्या नाहीत. या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे  पगार ऑक्टोबर 2024 पासून देण्यात आलेले नाहीत. कामगारांना मिळणाऱ्या इतर सुविधाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मिल कामगारांना वाचवा अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे. सरकारी आस्थापनांमधील गणवेश पुरवण्याचे काम मिळाले तरीदेखील या मिलमध्ये काम करणारा कामगार वाचेल. यासाठी गरजेनुसार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या मिल सुरू करा, अशी मागणीही खासदार सावंत यांनी सरकारकडे केली आहे.