
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्साठी उभय देशांमध्ये सौदी अरेबियामध्ये शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच युक्रेनने मॉस्को शहर आणि आसपासच्या परिसरात ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात मांस गोदामातील तीन कर्मचारी ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो.
रशियात 343 ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहे. एकट्या मॉस्को शहरामध्ये 91 ठिकाणांवर तसेच कुर्स्क शहराच्या पश्चिम प्रांतात 126 हून अधिक ठिकाणांवर हल्ले घडवून दहशत माजवल्याची माहिती समोर आली आहे.
शांततेच्या बोलणीला सुरुवात झाल्यानंतर युक्रेनने ज्या ठिकाणांवरून आपले सैन्य माघारी बोलावले होते, त्याच ठिकाणांवर ड्रोन हल्ले करून दहशत माजवण्यात आली आहे. कुर्स्क येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळही हल्ले घडवण्यात आल्याने युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या शांततेच्या चर्चांना हा मोठा धक्का मानला जात आहे.