पक्षाचे झेंडे, बॅनर्स परवानगी न घेता लावल्यास कारवाई, पालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई शहराला विद्रुप करणारे बॅनर्स, फ्लेक्सविरोधात मुंबई महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी अथवा रहिवासी सोसायटय़ांमध्ये पालिकेची परवानगी न घेता राजकीय पक्षाचे झेंडे, फ्लेक्स लावल्यास कडक कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसे प्रतिज्ञापत्रच पालिकेने हायकोर्टात दाखल केले आहे.

शीव येथे राहणारे निवृत्त कॅप्टन हरेश गगलानी यांच्या इमारतीच्या कंपाऊंड वॉलवर एका राजकीय पक्षाचे झेंडे व फ्लेक्स नोव्हेंबर 2023 साली लावण्यात आले होते. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी गगलानी यांनी सोसायटीसह पालिकेला पत्र लिहिले, याशिवाय गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केली. मात्र कारवाई न केल्याने गगलानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. दर्शीत जैन यांच्यामार्फत याचिका दाखल केला होती.