
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरोपींमध्ये कोणतीही भीती राहिलेली नाही. स्वारगेट येथे तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पुण्यात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
धनकवडी येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात (आयुर्वेदिक मसाज सेंटर) काम करणाऱ्या महिलेला आरोपीने अर्धनग्न होण्यास भाग पाडले. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी सांगतो तसे जर तू उपचार केले नाहीस, तर तुझे आयुर्वेदिक केंद्र बंद करून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने जबरदस्ती उपचार करून घेतला. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने उपचार सुरू असतानाच गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर, आरोपीने आपल्या साथीदारांसह दुकानात घुसून महिलेची आर्थिक लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहित गुरुदत्त वाघमारे, शुभम चांगदेव धनवटे, राहुल ज्ञानेश्वर वाघमारे अशी आरोपींची नावे आहेत.
3 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित वाघमारे धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात आला. त्याने उपचाराची माहिती विचारली आणि एका तासासाठी उपचार घ्यायचे असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान, त्याने वापरण्यात येणाऱ्या तेलाची चौकशी केली आणि तिळाचे तेल वापरण्यास सांगितले. उपचार सुरू असताना, आरोपीने पीडित महिलेस जबरदस्तीने तिचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्यावेळी त्याने धमकी दिली की, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. जर मी सांगतो तसे उपचार केले नाहीस, तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन. पीडितेच्या इच्छेविरुद्ध आरोपीने जबरदस्तीने उपचार करून घेतला.
थोड्या वेळाने आरोपीच्या इतर २-३ साथीदारांनीही उपचार केंद्रात प्रवेश केला आणि त्यांनी पीडितेकडे 20 हजार रुपये मागितले. त्यानंतर, उपचार करताना गुपचूप रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पीडितेने पैसे नाकारल्यानंतर, आरोपींनी काउंटरमधील पैसे लुटून पळ काढला. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.