लेख – भूगोल बदलणाऱ्यांचा इतिहास बदलता येणार नाही!

>>अॅड. प्रतीक राजूरकर, [email protected]

बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्या प्रति राजकीय आकसातून काय कारवाई करावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र इतिहासाचे पुनर्लेखन करताना बांगलादेश सरकारने त्या देशाचे स्वातंत्र्य हिंदुस्थानमुळेच मिळाले हा इतिहास बदलण्याच्या भानगडीत पडू नये. भूगोल बदलणाऱ्या हिंदुस्थानचा इतिहास बांगलादेशच काय, कुणाला बदलता येणार नाही.

खाद्या देशात सत्तांतर होऊन परस्परविरोधी विचारसरणीचे राज्य आले की, अतिशय टोकाचे निर्णय घेण्याची नवीन प्रथा अस्तित्वात आली आहे. बांगलादेशात गेल्या वर्षी शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनुस यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व आले. महंमद युनुस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने सहा महिन्यांतच बांगलादेशचा इतिहास कायमचा बदलण्याचे नसते उद्योग सुरू केले आहेत. मुजीबुर रहमान यांचे बांगलादेशचे ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी नष्ट व्हावी यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अंतरिम सरकारच्या आदेशान्वये बांगलादेशच्या पाठय़पुस्तक मंडळाने पहिला हात घातला आहे तो अभ्यासक्रमातील इतिहास बदलण्याला. मुजीबुर रहमान, शेख हसीना यांच्यासह हिंदुस्थानचे सैन्य, पाकिस्तानच्या फाळणीच्या शिल्पकार इंदिरा गांधींच्या बाबतीत असलेली माहिती अभ्यासक्रमातून काढण्याचे नसते उद्योग बांगलादेशने सुरू केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने इतिहास दडपणे आणि बदलणे यासाठी 57 तज्ञांची नियुक्ती केली आहे. नियुक्त तज्ञ मंडळींनी बांगलादेशातील तब्बल 441 पाठय़पुस्तकांतून बांगलादेश निर्मितीचा इतिहास बदलण्याची उठाठेव सुरू केल्याचे प्रकाशित आहे. नवीन इतिहासाचा समावेश असलेल्या पाठय़पुस्तकांच्या 40 कोटी प्रती या वर्षी छापून तयार आहेत.

बांगलादेश पाठय़पुस्तक मंडळाने शेख हसीना व मुजीबुर रहमान यांचे छायाचित्र पाठय़पुस्तकातून वगळले आहे. हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे वगळण्यात आली. पाठय़पुस्तकांतून शेख हसीना यांचा असलेला संदेश काढून जुलै 2024 साली शेख हसीना यांच्याविरुद्ध झालेल्या उठावाची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. बांगलादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वातील 16 वर्षांचा अवामी लीगचा इतिहास समूळ नष्ट व्हावा हा या इतिहास बदलातील राजकीय हेतू. मुजीबुर रहमान व इंदिरा गांधी यांची दोन एकत्रित छायाचित्रे पाठय़पुस्तकातून काढण्यात आली आहेत. फेब्रुवारी 1972 मध्ये इंदिरा गांधी, मुजीबुर रहमान यांची कोलकाता येथील जाहीर सभा, ढाका विमानतळावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्वागत करतानाचे मुजीबुर रहमान यांचे छायाचित्र, मुजीबुर रहमान यांच्या इतर देशांतील नेतृत्वासमवेतची छायाचित्रांना नवीन पाठय़पुस्तकात स्थान देण्यात आलेले नाही. बांगलादेशचे राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजसुद्धा पाठपुस्तकात गरजेचा नाही म्हणून तो शेवटच्या पानावर टाकण्यात आला असून भविष्यात तो कायमचा काढण्यात येण्याची शक्यता पाठय़पुस्तक मंडळाने वर्तवलेली आहे. मुजीबुर रहमान यांच्या कविता, धडे वगळून त्यांच्या व शेख हसीना यांच्या राजकीय विरोधकांना पाठय़पुस्तकात मानाचे स्थान बांगलादेश पाठय़पुस्तक मंडळाने दिले आहे. प्रामुख्याने 2024 सालचा उठाव, शेख हसीना यांची कारकीर्द कशी डागाळलेली होती यावर पाठय़पुस्तक मंडळाचा जोर अधिक दिसून येतो. हिंदुस्थानने सर्वात अगोदर बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर केले. बांगलादेशला आता उपरती होऊन भूतानने बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र असल्याचे सर्वात अगोदर 3 डिसेंबर 1971 रोजी जाहीर केल्याचे पाठय़पुस्तक मंडळाचे संशोधन आहे. या वर्षी वेळेअभावी फार कमी मजकूर बदलण्यात आल्याचे बांगलादेश पाठय़पुस्तक मंडळाने जाहीर केले असून पुढील वर्षी होणारे बदल मोठय़ा प्रमाणात असतील याचे सूतोवाच केले आहे.

मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानने अटक केली होती. त्यांना अटक झाल्यावर बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा नारा देणाऱ्या मुजीबुर रहमान यांचे योगदान केवळ शेख हसीनांसमवेत असलेल्या राजकीय वैमनस्यातून इतिहासातून वगळण्यात आले आहे. इतिहासात शेख हसीना विरोधकांना स्थान देऊन बांगलादेशने आपला स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासाचे चालवलेले अवमूल्यन जागतिक स्तरावर निंदेचा विषय ठरू लागले आहे. हिंदुस्थानचे बांगलादेशवर अनंत उपकार आहेत. हिंदुस्थानच्या मदतीशिवाय बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवता येणे अशक्य होते. हिंदुस्थानचे वायुदल, नौदल, सैन्य, गुप्तहेर, बांगला मुक्ती वाहिनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, रॉचे जनक रामेश्वरनाथ काव, जनरल माणेकशॉ यांच्या मदतीशिवाय बांगलादेशचे स्वातंत्र्य अपूर्ण होते. तब्बल 8 महिने 2 आठवडे आणि 6 दिवस म्हणजेच 26 मार्च 1971 ते 16 डिसेंबर 1971… हिंदुस्थानचा या युद्धात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. हिंदुस्थानच्या तीन हजारांपेक्षा अधिक सैनिकांचे हौतात्म्य, 12 हजार जखमी सैनिकांच्या रक्ताने बांगलादेश स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला आहे. बलाढय़ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वेळोवेळी खडे बोल सुनावून इंदिरा गांधींनी हिंदुस्थानच्या गौरवात अधिकच भर घातली. इंदिरा गांधींनी निक्सन यांच्या इशाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात आपल्या नेतृत्वाची चुणूक जगाला दाखवून दिली.

बांगलादेशने आपल्या पाठय़पुस्तकात हिंदुस्थानऐवजी भूतानला दिलेले श्रेय म्हणूनच दुर्दैवी ठरते. चीन, अमेरिका, पाकिस्तान यांच्या विरोधात हिंदुस्थानी सैन्य आणि नेतृत्व उभे ठाकले तेव्हाच बांगलादेशचा जन्म होऊ शकला. हिंदुस्थानचे योगदान, तत्कालीन पंतप्रधानांच्या खंबीर नेतृत्वापुढे पाकिस्तान, चीन अमेरिकेला नमते घ्यावे लागले आणि अखेर पाकिस्तानने शरणागती पत्करली. त्या सुवर्णक्षणाची छायाचित्रे बांगलादेशने आपल्या पाठय़पुस्तकात कायम ठेवली आहेत. वेळेअभावी बांगलादेशच्या पाठय़पुस्तक मंडळाने फार कमी मजकूर हटवल्याचे सांगत भविष्यात काही मजकूर वगळण्यात येईल असे विधान केल्याचे प्रकाशित आहे. बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्या प्रति राजकीय आकसातून काय कारवाई करावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र इतिहासाचे पुनर्लेखन करताना बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदुस्थानच्या सहभागाचा इतिहास बदलण्याच्या भानगडीत पडू नये. 1971 मध्ये हिंदुस्थानने जगाचा भूगोल बदलण्याचे आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. भूगोल बदलणाऱ्या हिंदुस्थानचा इतिहास बांगलादेशच काय, कुणाला बदलता येणार नाही.