
नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे हिंदुस्थानातील नोकरदार वर्गात नाराजीचा सूर आहे. याचाच एक भाग म्हणजे 2020 च्या कोरोना महासाथीनंतर प्रथमच कंपनी बदलणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 2024 या वर्षात आर्थिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या बदलण्याबाबत सावध भूमिका घेतली. ‘डेलॉइट इंडिया टॅलेंट आऊटलुक सर्व्हे’मधून ही बाब समोर आली आहे. 2024 मध्ये कंपन्यांनी सरासरी 17.4 टक्के कर्मचारी कमी होण्याचा दर नोंदवला, जो 2023 मध्ये 18.1 टक्के, 2022 मध्ये 20.2 टक्के आणि 2021 मध्ये 19.4 टक्के एवढा होता.
गतवर्षी जवळपास सर्वच क्षेत्रांतील कामगारांचे नोकरी बदलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, एचसीएलटेक, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या काही आयटी कंपन्यांनी डिसेंबर तिमाहित कमी प्रमाणात नोकरभरतीत वाढ केली. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडी, वाढ मंदावणे अशा काही कारणांमुळे नोकरभरतीत लक्षणीय घट झाली आहे.
नोकरीच्या संधी कमी झाल्या
सर्वेक्षणात विविध सात क्षेत्रांतील 500 पंपन्यांचा समावेश होता. अलीकडच्या काळात सर्वात कमी 15.8 टक्के नोकरी सोडण्याचा दर 2020 मध्ये होता. 2019 मध्ये कोविडपूर्वी कर्मचारी कमी होण्याचा दर 17.5 टक्के इतका होता. एकूणच कोरोनानंतर प्रथमच 2024 या वर्षात कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा दर घटला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नोकरीच्या संधी कमी झाल्या असल्याचे जाणकारांनी सांगितले.