
रापम सिंधुदुर्ग विभागात नव्याने आलेल्या लाल परिवर्तन 20 गाड्या नव्याने दाखल झाल्या. अन्य आगारात प्रत्येकी 10 नवीन गाड्या देण्यात आल्या आहेत. देवगड आगार मात्र गेल्या 15 वर्षांपासून उपेक्षितच आहे. या आगाराला 15 वर्षांपासून नवीन गाड्यांची प्रतिक्षा आहे. यामुळे देवगडवासियांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या आगारात नवीन गाड्या येणार आणि लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार असे गाजर दाखण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. त्यामुळे देवगडवासियांना जुन्या जीर्ण गाड्यांमधून प्रवास करावा लागणार आहे.
देवगड आगारातील 12 गाड्या जीर्ण झाल्याने त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या 44 गाड्यांद्वारे देवगड आगाराचा कारभार हाकावा लागत आहे. यामुळे देवगड आगारातील लांब पल्ल्याच्या बहुतांशी प्रवासी फेऱ्या बंद ठेवाव्या लागल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गाड्यांच्या कमतरतेमुळे देवगड आगारातून सुटणाऱ्या देवगड उमरगा, देवगड, पणजी, बेळगाव, सांगली, नालासोपारा, मिठबाव तांबळडेग फोंडा आणि अन्य स्थानिक फेऱ्या अनेकदा बंद कराव्या लागतात. याकडे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.