Pakistan Train Hijacked – BLA कडून 20 पाकिस्तानी सैनिक ठार; सैनिकी कारवाई थांबवण्याचा इशारा

पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस हायजॅक करत 180 प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान बीएलएने 20 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. तसेच पाकिस्तानने सैनिकी कारवाई केल्यास सर्व ओलितांना ठार मारण्याचा इशाराही बीएलएने दिला आहे. याबाबत पाकिस्तानी लष्कर किंवा पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही.

ओलीस ठेवलेल्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक, पोलीस, दहशतवादविरोधी पथक, आयएसआयच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वजण सुट्टीनिमित्त जाफर एक्सप्रेसने पंजाबला चालले होते. मात्र पेशावर ते क्वेटा दरम्यान बलुचिस्तान भागातील मच भागत बलूच लिबरेशन आर्मीने ट्रेन हायजॅक केली.

बीएलएने रेल्वे रुळ उडवल्याने ट्रेन थांबली. यानंतर त्यांनी ट्रेन हायजॅक करत प्रवाशांना ओलीस ठेवले. ट्रेन हायजॅक केल्यानंतर बीएलएने त्यांच्याविरोधात कोणताही कारवाई केल्यास सर्व प्रवाशांना ठार मारू अशी धमकी दिली होती. मात्र पाकिस्तानी लष्कराने या धमकीला न जुमानता कारवाई सुरू केली.