Mumbai News – किरकोळ वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोन आरोपींना अटक

किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विघ्नेश नारायण चांडले असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीडित आणि आरोपी एकाच परिसरातील रहिवासी आहेत. सुमित अंबुरे आणि ओंकार मोरे अशी अटक आरोपींची नावे आहेत. सुमित आणि ओंकारचा विघ्नेशसोबत किरकोळ वाद झाला. मात्र हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ओंकारने विघ्नेशवर चाकूने हल्ला केला.

विघ्नेशच्या छातीत वार केल्याने तो जागीच कोसळला. त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर दोन्ही आरोपींना राहत्या परिसरातून अटक केली. दोन्ही आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.