UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, BJP आमदाराच्या मुलावर हत्येचा आरोप

यूपीएससीची तयारी करत असलेल्या राजस्थानच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. राजकुमार जाट असे मयत तरुणाचे नाव आहे. गुजरातमधील भाजप आमदाराच्या मुलाने आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप मयत तरुणाच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मयत राजकुमार हा मूळचा राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जबरकिया येथील रहिवासी होता. मात्र त्याचे कुटुंब कामानिमित्त 30 वर्षांपासून गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथे राहत आहेत. राजकुमार हा यूपीएससीची तयारी करत होता. 3 मार्च रोजी राजकुमार बेपत्ता झाला. त्यानंतर 9 मार्च रोजी त्याचा मृतदेह सापडला.

राजकुमारच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी दोघे पिता-पुत्र मंदिरात गेले होते. मंदिरातून घरी परतत असताना वाटेत महिला आमदाराच्या लोकांनी गाडी थांबवली आणि मुलाला एका घरात घेऊन गेले. तेथे एका तरुणाने राजकुमारला मारहाण केली आणि मग घरी आणून सोडले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा राजकुमारला मारहाण करायला सुरुवात केली. आमदार जडेजा यांचा मुलगाही यात सामील होता. काही वेळाने, वडील आणि मुलगा बाईकवरून घरी परतले. यानंतर मुलगा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. मात्र सकाळी खोलीत जाऊन पाहिले असता मुलगा नव्हता. यानंतर वडिलांनी आमदार पुत्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

याप्रकरणी नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदार हनुमान बेनीवाल यांनी X वर पोस्ट करत ही मागणी केली आहे. तसेच पीडित कुटुंबाला मदत करावी आणि न्यायाच्या लढाईत पाठिंबा द्यावा, असे आवाहनही बेनीवाल यांनी जाट समुदायाला केले आहे.

गुजरात पोलिसांनी या कुटुंबावर अनैतिक दबाव आणू नये, असेही त्यांनी म्हटले. या हत्येप्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही बेनीवाल यांनी केली आहे. याशिवाय सहादाचे आमदार लाडू लाल पिताली आणि माजी मंत्री डॉ. रतनलाल जाट यांनीही दोषींवर कडक करावी. तसेच प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.