
तलासरी शहरातील स्टेट बँकेच्या संथ कारभारामुळे भर उन्हाळ्यात ग्राहकांना उन्हाचा मारा सहन करावा लागत असून बँकेचे अधिकारी मात्र एसीत बसून गारेगार हवा खात आहेत. पारा थेट 40 अंशापर्यंत गेलेला असताना ग्राहकांना पैसे काढण्यासाठी उन्हात रांग लावावी लागत आहे. आजही या बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठी रांग लागली होती.
महिनाभराचा पगार, पेन्शन आणि येऊ घातलेल्या होळी सणासाठी सर्वसामान्य ग्राहक पैशांसाठी बँक गाठतात. या काळात बँकेचे अधिकारी ग्राहकांची काळजी घेण्यापेक्षा फक्त स्वतःची काळजी घेत आहेत. पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागल्यानंतरही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काम होत असल्याने ग्राहकांना उन्हातान्हात ताटकळत थांबावे लागत आहे. तलासरी हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यात स्टेट बँकेची एकच शाखा आहे. त्यामुळे याच शाखेत परिसरातील गावामधील लाडक्या बहिणी, शेतकरी आणि निवृत्त पेन्शनधारकांचे खाते आहेत. या शाखेत तलासरी तालुक्यासह डहाणू तालुक्यातील काही गावातील नागरिकांची खाते असल्याने बँकेत नेहमीच जत्रेसारखी गर्दी असते.
सेवासुविधांचा अभाव
तलासरी येथील स्टेट बँकेचे कामकाज संथ गतीने सुरू असल्याने ग्राहक अनेक तास ताटकळत थांबतात बँक व्यवस्थापनाच्या या ग्राहकांना वतीने कोणत्याही सेवासुविधा दिल्या जात नाही. पिण्याचे पाणी या बँकेत उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे