जालन्यात वाळूमाफियांचा थैमान, नायब तहसीलदारासह पथकावर हल्ल्याचा प्रयत्न!

जालना जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे थैमान वाढत चालले असून दिवसेंदिवस समाजकंटकांची हिंमत वाढतच चालल्याचे चित्र आहे. बदनापूर तालुक्यातील घोटन येथे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांनी मंगळवारी 11 मार्च रोजी सकाळी कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल पथकातील नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली तेव्हा शेकडो ग्रामस्थ असताना त्यांच्यासमोरच महसूल पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

बदनापूर तहसील कार्यालयातर्फे अवैध वाळू उपसा व वाहतूकीबाबत महसूल विभागाचे पथक नायब तहसीलदार हेमंत दयाराम तायडे, काकासाहेब जाधव, योगेश अनारसे, प्रदीप गायकवाड हे घोटन परिसरात दुधना नदीत वाळू उपसा होतो का याबाबत पाहणी करत होते. त्यावेळी एका ट्रॅक्टरमध्ये अवैध उत्खनन करून वाळू वाहतूक करताना दिसले. महसूल पथक पाहताच ट्रॅक्टरचालकाने वाळूसह ट्रॅक्टर जोरात पळवून थेट घोटनकडे पळण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल पथकानेही सिनेस्टाईल त्याचा पाठलाग सुरू केला. हे ट्रॅक्टर थेट घोटन ग्राम पंचायत कार्यालयासमोर आले असता महसूल पथकाने त्यांची दुचाकी ट्रॅक्टरसमोर लावली असता ट्रॅक्टरचालकाने वाहन बंद करून पोबारा केला असता महसूल पथकाने ट्रॅक्टरचे फोटो काढून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस कर्मचारी घोटनकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले मात्र तोपर्यंत येथेच काही समाजकंटकांनी जमाव जमा करून या वाळू माफियांनी थेट नायब तहसीलदार हेमंत दयाराम तायडे व त्यांच्या पथकावर हल्ला केला. हल्ला करून त्यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. विशेष म्हणून सकाळची वेळ असल्याने ग्राम पंचायत घोटन येथे शेकडो ग्रामस्थ जमा होते. मात्र, या शेकडो जमावापुढेच वाळूमाफियांनी नायब तहसीलदार हेमंत तायडे व त्यांच्या सोबतच्या पथकावर हल्ला करून सर्वांसमोर वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेला. अशा घटनांमुळे गुन्हेगारांवर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून आले असून दिवसेंदिवस गुन्हेगारीकरण वाढत चालल्याने सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.