
रायगड जिल्ह्यात एकूण 28 धरणे असून त्यापैकी सात धरणांची घसरगुंडी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरणांमध्ये 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने रायगडवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. पाणीसाठा खालावल्याने रायगडच्या कोलाड पाटबंधारे विभागाकडून धरणातून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची 30 टक्क्यांनी घट केली आहे.
कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. त्यापैकी घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, राणीवाली, वरंध, कोथुर्डे या सात धरणांमधील पाणीसाठा सात धरणांमधील पाणीसाठा 40 टक्क्यांहून कमी झाला आहे त्यामुळे धरणांमधून सुरू असलेला विसर्ग 30 टक्क्यांनी कमी केला आहे. या कमी पाणीपुरवठ्यामुळे आसपासच्या काही गावांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अनियोजित कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरवर्षी पाण्यासाठी वणवण
रायगड जिल्ह्यात दरवर्षी पुरेसा पाऊस पडूनही दरवर्षी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. जिल्ह्यात 100 हून अधिक गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तोडगा काढण्याऐवजी प्रशासन फक्त तात्पुरत्या उपाययोजनांवर जोर देत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.