ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी; राजकीय मुजोरीमध्ये मांडलेला अर्थसंकल्प, भास्कर जाधव कडाडले

निवडणूक झाली असून सत्ताधारी पक्षाला प्रचंड असे पाशवी बहुमत मिळाले. ज्या लोकांनी बहुमत दिले त्यांचा फार काही विचार करण्याची गरज नाही. एखादा घटक आपल्याबरोबर राहिला काय आणि नाही राहिला काय याची पर्वा करण्याची गरज नाही, अशा अत्यंत राजकीय मुजोरीमध्ये मांडलेला हा अर्थसंकल्प आहेत, असा हल्लाबोल शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी चढवला. ते विधिमंडळ आवारात माध्यमांशी संवाद साधत होते.

निवडणूक जाहिरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफी करू असे सांगितले होते, मात्र त्याचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. लाडक्या बहि‍णींसाठी 36 हजार कोटींची तरतूद केली आहे. हे पैसेही खर्च होणार नाहीत. कारण 2 कोटी 53 लाख लाभपात्र महिलांपैकी 10 लाख महिलांचे नाव चौकशीच्या फेऱ्यात अडकवून कमी करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

मुंबईमध्ये 64 हजार कोटींची विकासकामे करतोय, असेही सांगितले. पण संपूर्ण बजेटमध्ये मुंबईसाठी एक रुपयांचीही तरतूद नाही. याचाच अर्थ जुनी कामे नव्याने करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न असून मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवरही यांची नजर आहे. 99 हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी आतापर्यंत 12 ते 17 हजार कोटी काढण्यातही आल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकारने 45 हजार 898 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहिल्यास तूट कमी होण्याऐवजी वाढत आहे. जीएसटीचे पैसे मोठ्या प्रमाणात येत असतानाही तूट वाढत असून याचा भार सर्वसामान्यांवर टाकला जात आहे. गेल्यावेळी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केलाला, पण यावेळी यात 2 ते 3 टक्के वाढ करण्यात आली. सर्वसामान्य माणसाला आर्थिक खाईत लोटण्याचे काम अर्थसंकल्पातून झाले.

दुसऱ्या बाजुला अदानीसारख्या माणसासाठी तिजोरी खाली करण्याचे काम सुरू आहे. अदानीला दिलेले दोन्ही एअरपोर्ट जोडण्याचे काम सरकारी तिजोरीतून केले जाणार आहे. शिवभोजन थाडी बंद करून सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेण्यात आला. लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देखील निवडणुकीची जुमलेबाजी ठरली, असेही भास्कर जाधव म्हणाले.