
महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असताना आता अर्थसंकल्पातील निधीवाटपातही भाजप व अजितदादा गटाने शिंदे गटावर कुरघोडी केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटापेक्षा शिंदे गटाने जास्ती जागा मिळवल्या, पण तरीही बजेटमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांना सर्वात कमी निधी वितरित करून शिंदेंच्या मंत्र्यांची कोंडी केली आहे. अपुऱ्या निधीवाटपावरून महायुतीमध्ये बेबनाव होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात निधीवाटपावरून शिंदे गटाने अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार निधीवाटपात भेदभाव करतात, आम्हाला निधी देत नाहीत, असाही एक आरोप करीत शिंदे गटाने गद्दारी केली आणि महाविकास आघाडीच्या बाहेर पडले होते. आता महायुतीमध्येही अजित पवार यांनी शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे. शिंदे गटाचे 57 आमदार तर अजितदादा गटाचे 41 आमदार आहेत. शिंदेंचे आमदार जास्त असले तरी त्यांना कमी निधी मिळाला आहे. भाजपच्या वाट्याला तर भरघोस निधी आला आहे. महायुतीत असूनही बजेटमध्ये सर्वात कमी निधीवर बोळवण केल्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गटाची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.
भाजप ः 89 हजार 128 कोटी रुपये
अजित पवार गट ः 56 हजार 563 कोटी 45 लाख रुपये
शिंदे गट ः 41 हजार 606 कोटी 55 लाख रुपये