Maharashtra Budget 2025 – बोगस, निस्तेज अर्थसंकल्प, आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर बोगस असे करावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी दिली. भाजपच्या अपवित्र युतीने दिलेल्या एकाही आश्वासनाचा अर्थसंकल्पात समावेश केलेला नसून जनेतेने नव्हे तर निवडणूक आयोगाने निवडलेल्या सरकारच्या निस्तेज मूडला सामावून घेणारा निस्तेज अर्थसंकल्प, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली. महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आले हे भाजपला माहीत असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. लाडक्या बहिणीला दिलेले 2100 रुपयांचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मुंबईतील वाढलेला खर्च आकड्यात दाखवला

मुंबईत दाखवलेली 64 हजार कोटींची कामे नवीन नाहीत, त्यापैकी बरीचशी कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतेक कामांना उशीर झाल्याने खर्च वाढला आहे. त्यामुळेच हा खर्च या आकड्यात दाखवला आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केल्यानंतर अद्यापपर्यंत अरबी समुद्रात उभारल्या न गेलेल्या शिवस्मारकाचाही उल्लेख नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईला ‘गिफ्ट सिटी’सारखे फायदे मिळतील?

मुंबईतील व्यापार केंद्रांचा अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी ‘कुर्ला-वरळी’ म्हणजे काय? मुंबईला ‘गिफ्ट सिटी’सारखे फायदे मिळतील का? दोन विमानतळांमधला मेट्रो कनेक्टर अदानी समूहाऐवजी सरकारने करदात्यांच्या पैशातून का करावा, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पातील प्रत्येक उल्लेख कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.