
मुंबईमधील गणेशोत्सव मंडळांना तब्बल 100 वर्षांची परंपरा असून ही सर्व मंडळे अधिकृत आणि नोंदणीकृत आहेत. शिवाय मुंबईच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. असे असताना एक गाव एक गणपती अशी संकल्पना पर्यावरण मंत्री कशी काय मांडू शकतात, असा सवाल करीत मुंबईमधील गणेशोत्सवाची आधी माहिती घ्या, नंतरच विधाने करा, अशा शब्दांत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवण्याची गरज असल्याचे विधान केले. शिवाय गणेशोत्सवात प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर सर्रासपणे होत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र पंकजा मुंडेंचा दावा सार्वजनिक गणेशोत्सव समितीने खोडून काढला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही मंडळाकडून थर्माकोल किंवा प्लॅस्टिकचा वापर केला जात नसल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे. जर वापर होत असेल तर गेल्या दोन वर्षांत किती कारवाई झाली आणि असा वापर होत असेल तर आपला विभाग काय करतो, असा टोलाही समन्वय समितीने लगावला आहे.
मंडळांकडून सामाजिक बांधिलकी
मुंबईच्या वेगवेगळय़ा भागांतील मंडळे वर्षभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. शिवाय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून संस्कृती-परंपराही जपली जाते. नैसर्गिक संकटातही मंडळांकडून नागरिकांना आर्थिक आणि इतर आवश्यक मदत केली जाते. त्यामुळे मंडळांच्या उत्सवावर निर्बंध घालता येणार नाही. एक गाव एक गणपती ही संकल्पना एकवेळ काही गावांमध्ये राबवता येईल, मात्र शहरात हे शक्य नाही.