ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे वानुआटूच्या पंतप्रधानांचे आदेश

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना दिलेला पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआटू देशाचे पंतप्रधान जॉथम नापत यांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी सिटीझनशीप कमिशनला पासपोर्ट रद्द करण्यास सांगितल्यामुळे ललित मोदींच्या अडचणी वाढल्या आहेत. मोदी यांनी प्रत्यार्पणापासून बचाव करण्यासाठी वानुआटूचे नागरिकत्व घेतले असल्याचा आरोप नापत यांनी केला आहे.

आयपीएलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. याप्रकरणी हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांना मोदी यांची चौकशी करायची आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांमधून माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नापत यांनी ललित मोदींचा पासपोर्ट ताबडतोब रद्द करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ललित मोदींच्या नागरिकत्वाच्या अर्जाची सखोल चौकशी करण्यात आली. इंटरपोलच्या स्क्रिनिंगचाही समावेश होता. मात्र, त्यावेळी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही.