स्वामी समर्थ श्रीचा विश्वनाथ विजेता; मुंबईच्या स्पर्धेवर ठाण्याचे वर्चस्व, महिलांच्या शरीरसौष्ठवात मनीषा हळदणकर अव्वल

खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणाऱया प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सांगलीचा विश्वनाथ बकाली विजेता ठरला. आमदार महेश सावंत यांच्या कल्पनेतून झालेल्या या थरारक स्पर्धेत दिव्यांगांच्या गटात रत्नागिरीच्या गणेश गोसावीने तर महिलांच्या गटात ठाण्याच्या मनीषा हळदणकरने उपस्थितांची मने जिंकली.

राज्यभरातून आलेल्या 95 दर्जेदार स्पर्धकांच्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याने मुंबई आणि उपनगरच्या तगडय़ा खेळाडूंना मागे टाकत बाजी मारली. आठपैकी तीन गटांत ठाण्याच्या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले, तर मुंबईच्या बप्पन दासलाच गटविजेते पद जिंकता आले. शशांक वाकडेच्या अनुपस्थितीमुळे सांगलीच्या विश्वनाथ बकालीपुढे कुणाचेच आव्हान टिकले नाही.

स्वामी समर्थ श्रीच्या निमित्ताने अक्षरशः पीळदार खेळाडूंचे झुंड पाहायला मिळाले. दत्तू बांदेकर चौकात हजारो क्रीडाप्रेमींच्या उत्साहवर्धक उपस्थितीत पार पडलेल्या या क्लासिकल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची पीळदार श्रीमंती अनुभवायला मिळाली. 95 स्पर्धकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन करायला उतरलेल्या खेळाडूंवर स्वामी समर्थ मंडळाने अक्षरशः सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली.

मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना स्वामी समर्थ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळाले. स्पर्धा आठ गटांत असली तरी प्रत्येक गटात दर्जेदार आणि पीळदार खेळाडू उतरले होते. पहिल्या चार गटांत तर अव्वल पाच खेळाडू निवडताना पंचांना डोळ्यात तेल घालून आपला निकाल नोंदवावा लागत होता. स्पर्धा मुंबईत असली तरी या स्पर्धेत ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि अहिल्या नगरातील खेळाडू आपली करामत दाखवत होते. 55 किलो वजनी गटात अव्वल स्थानासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या अवधूत निगडेने ठाणेकर सागर मानेला मागे टाकत यश संपादले. 60 किलो वजनी गटात ठाण्याचा आशीष खांडेकर पहिला आला तर 65 किलो वजनी गटात जागतिक कीर्तीचा नितीन म्हात्रे अव्वल ठरला. 70 किलो गटात मुंबईच्या बप्पन दासने बाजी मारली. मुंबईला एकमेव गट विजेतेपद त्यानेच जिंकून दिले. त्याच्या देहयष्टीसमोर सारेच खुजे वाटत होते. 75 किलो गटात कोल्हापूरचा पंचाश्री लोणार पहिला आला.  80 किलो वजनी गटात सांगलीच्या हर्षद नेवेकरीने जळगावच्या जितेंद्र गिरीवर मात केली. 85 किलो वजनी गटात विश्वनाथ बकालीच्या देहयष्टीसमोर कुणाचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे किताबाच्या लढतीत त्याने आपल्या सातही प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्वामी समर्थ श्रीवर आपले नाव कोरले.

 या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत, अध्यक्ष रामदास गावकर, कार्याध्यक्ष गिरीश सक्रे, उपाध्यक्ष चंद्रकांत परब, संजय भगत, संयुक्त कार्यवाह जयराम शेलार, बाळा बागडे, महिला कार्यकर्त्या शरण शेलार, निशा फोडकर, दीपाली जंगम, शीतल बोरकर, रेखा देवकर, कीर्ती म्हस्के, संजना पाटील यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज पदाधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रभाकर कदम, मनीष आडविलकर, मदन कडू, राज यादव, राजेंद्र गुप्ता यांच्या उपस्थितीत पार पडला.