भीमसैनिकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यातील त्रुटी दूर करा

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांच्या निर्माणाधीन पुतळ्यातील त्रुटी दूर करा, या मागणीसाठी इंदू मिल संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी इंदू मिलसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दादरच्या इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या प्रतिकृतीमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी इंदू मिल संघर्ष समितीने वारंवार राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे केली. तरीदेखील राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करून घाईघाईने हा पुतळा उभारण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर इंदू मिल संघर्ष समिती समन्वय प्रमुख, शिवसेना संघटक विलास रूपवते आणि प्रतीक कांबळे यांनी सोमवारी इंदू मिल येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना अडवले. दरम्यान, उद्या, मंगळवारपासून अधिवेशन सुरू असेपर्यंत मंत्रालयासमोर दररोज एक भीमसैनिक मुंडन करून राज्य सरकारचा निषेध करेल, असा इशारा विलास रुपवते यांनी दिला.