
स्थानिक खेळाडूंना संधी देत त्यांच्यातील कौशल्याला चालना मिळावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित खेळ महोत्सव क्रिकेट स्पर्धेची फटकेबाजी नायगावच्या पुरंदरे मैदानात सुरू झाली. 32 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक क्रिकेटपटूंना स्वतःची कौशल्ये सादर करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. विविध भागांतील संघ एकमेकांसमोर उभे ठाकत असून प्रत्येक सामना चुरशीचा होत आहे. खेळाडूंची जबरदस्त ऊर्जा आणि मैदानावरील स्पर्धात्मकतेमुळे प्रेक्षकांना उत्कृष्ट सामने पाहायला मिळत आहेत. यासाठी या आयोजनाचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले आहे.
खेळ ही केवळ स्पर्धा नसून एकत्र येण्याचा, संघभावना वाढवण्याचा आणि निरोगी जीवनशैली जोपासण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. खेळामुळे अनुशासन, मेहनत आणि आत्मविश्वास वाढतो, याची जाणीव या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.
या स्पर्धेचे आयोजन भविष्यातही मोठय़ा प्रमाणावर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. परिसरातील तरुणांना क्रीडाविषयक अधिक संधी मिळाव्यात यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दिमाखदार स्पर्धेच्या उद्घाटनाला राकेश देशमुख (विधानसभा संघटक), अभिषेक सावंत (शाखाप्रमुख), अभिषेक बासुतकर, किरण देशमुख, प्रदीप कदम, अजय गुरव, प्रफुल सोलंकी, विशाल कदम आणि संतोष चौगुले यांचीही उपस्थिती होती.