
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर रवींद्र जाडेजा निवृत्त होणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र ‘‘जाडेजाने अनावश्यक कोणतीही अफवा पसरवू नका, धन्यवाद…’’ अशी सोशल मीडियावर पोस्ट करून एका वाक्यात चाहत्यांच्या मनातील धडकी थांबवली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जेव्हा रवींद्र जाडेजाने आपली दहा षटकं पूर्ण करताच, विराट कोहलीने त्याला मिठी मारल्याचे सर्वांनी पाहिले होते. त्यामुळे रवींद्र जाडेजा आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर निवृत्ती घेणार, अशी अफवा सोशल मीडियावर वाऱयासारखी व्हायरल झाली. ‘टीम इंडिया’ने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यानंतर रवींद्र जाडेजाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ‘टीम इंडिया’ने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आता जाडेजा वन डे क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करणार, अशा चर्चांना उत आला होता. मात्र रवींद्र जाडेजाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या वेळी त्याने आपल्या पोस्टमध्ये एका वाक्यातच सर्व विषय संपवला.