चॅम्पियन्स कर्णधाराविना आयसीसीचा सर्वोत्तम संघ, सहा हिंदुस्थानी पण रोहितला स्थान नाही

‘टीम इंडिया’चा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये सामनावीर ठरला. मात्र आयसीसीने निवडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वोत्तम संघात चक्क चॅम्पियन कर्णधार रोहितला स्थान लाभलेले नाही. मात्र या निवडलेल्या 12 खेळाडूंच्या संघात तब्बल 6 हिंदुस्थानी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वोत्तम संघ जाहीर केला. मात्र या संघात रोहित शर्माला स्थान न देऊन ‘आयसीसी’ने हिंदुस्थानी चाहत्यांना जबर धक्का दिलाय. या संघाचे कर्णधार पद न्यूझीलंडच्या उपविजेत्या मिचेल सॅण्टनरकडे सोपविण्यात आले आहे. हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला या संघात बारावा खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

आयसीसीने निवडलेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वोत्तम संघ ः रचिन रवींद्र, इब्राहिम झदरान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला ओमरझाई, मिचेल सॅण्टनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅट हेन्री, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल.