
कॅनडाला मार्क कार्नी यांच्या रूपात लवकरच नवीन पंतप्रधान मिळणार आहे. लिबरल पार्टीच्या निवडणुकीत 59 वर्षीय कार्नी यांना 85.9 टक्के मते मिळाली. ते पंतप्रधान म्हणून जस्टिन टडो यांची जागा घेतील. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानसोबतचे कॅनडाचे संबंध तणावाचे राहिले आहेत. त्यात अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेला ‘टॅरीफ वॉर’चा मुद्दा ताजा असतानाच कॅनडाला नवीन पंतप्रधान मिळणार आहे. पंतप्रधानपदी निवड होताच कार्नी यांनी कॅनडाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले.
जानेवारीमध्ये टडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. पण, नवीन पंतप्रधान शपथ घेईपर्यंत कारभार सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. लिबरल पार्टीच्या निवडणुकीत जवळपास 1 लाख 52 हजार सदस्यांनी मतदान केले. कार्नी यांच्या पाठोपाठ माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
अमेरिकेला जशास तसे उत्तर देऊ
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर कार्नी यांनी अमेरिकेबद्दल आपले इरादे स्पष्ट केले. कॅनडा कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग होणार नाही, असे ते म्हणाले.