
छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकले. दरम्यान, या छापेमारीमुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ईडीच्या अधिकाऱयांच्या वाहनांवर दगडफेक करीत हल्ला केला.
भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री असताना हा मद्य घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मद्य घोटाळ्याला बघेल यांनी राज्याच्या तिजोरीमधील 2161 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तपासादरम्यान भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांचे नाव जोडले गेले आणि ईडीच्या चार पथकांनी बघेल कुटुंबाशी संबंधित 14 ठिकाणांवर छापे टाकले. 11 तास अधिकाऱयांनी बघेल यांच्या घराची झडती घेतली.
घोषणाबाजी, दगडफेक
ईडीच्या छापेमारीमुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. बघेल यांच्या भिलाई येथील घराबाहेर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. ईडी अधिकाऱ्यांचे पथक घराबाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्य़ा ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, छत्तीसगड विधानसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस आमदारांनी सत्ताधारी भाजपविरोधात घोषणा दिल्या. दोन्ही बाजूंनी आराप-प्रत्यारोपांमुळे गदारोळ माजला.
ईडीने नोटा मोजण्याचे मशीन आणल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले. केवळ 32-33 लाख रुपये ईडीला मिळाले. आमचे कुटुंब मोठे आहे. आमच्या कुटुंबाची एकत्र 140 एकर शेतजमीन आहे. शेतीतून उत्पादन मिळते. तसेच दुधाचाही व्यवसाय आहे, अशी माहिती बघेल यांनी दिली.
विधानसभेत गरीबांसाठीच्या घरकुल योजनेबाबत प्रश्न विचारल्यामुळे सूडबुद्धीने आज ईडीने धाड टाकली. भाजप घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी पराभवाला भीत नाही आणि मरणालाही घाबरत नाही. – भूपेश बघेल