
राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला असून तो शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा आहे. अर्थसंकल्पाला कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसल्याने हा पोकळ अर्थसंकल्प आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असेही सपकाळ म्हणाले.
राज्याचा हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी बनवलेला आहे का? अर्थमंत्र्यांच्या भाषणात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळं, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे. पण राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण किंवा उपाययोजना नाही. आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीबद्दल उल्लेखही करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ असून, आजही शेतकऱ्यांना वसुलीसाठी वीज बिले पाठवली जात आहेत, असेही सपकाळ यांनी सांगितले.
सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागापुरताच असून राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, लाडक्या बहिणींची सरकारमध्ये बसलेल्या कोडग्या भावांनी निराशा केली आहे. जवळपास 10 लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. उद्योग धंद्याची वाढ 5.6 टक्क्यांवरून 4.9 टक्क्यांवर घसरली आहे. 50 लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ऐकायला चांगले पण हे आकडे फक्त कागदावरच राहणार आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्ये फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी रोजगार नाही राज्यातील बेकारीचे चित्र अत्यंत भयावह आहे, अशी टीकाही त्यांनी केली.