ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्पा सोमवारी सुरू झाला. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग सरकारच्या नियंत्रणात आहे, असा आरोप सिब्बल यांनी संसदेच्या आवारात केला.

तुम्ही लोकशाहीबद्दल बोलता, जर लोकशाही अशीच चालू राहिली आणि निवडणूक आयोग सरकारची बाजू घेत राहिला तर येणारे निकाल तुमच्यासमोर आहेत, असे कबिल सिब्बल पुढे म्हणाले.

सध्या जी मतदान व्यवस्था आहे, लोकांची मतं रद्द होताहेत, लोकांना घारबाहेर पडू देत नाहीत, डुप्लिकेट मतदार कार्ड, जे लोक येथे राहत नाहीत त्यांचे मतदान कार्ड आहे. दोन-दोन खोल्यांमध्ये 50-50 मते बनवण्याची आणि भाजप सदस्यांच्या आधारे 11,000 मते कापण्याची पद्धत चालू राहिली तर तुम्ही ज्याला लोकशाही म्हणता ती लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, असे सिब्बल यांनी म्हटले.

निवडणुकीवरील शंकांशी संबंधित प्रश्नावर सिब्बल म्हणाले की, आम्ही हे बऱ्याच काळापासून सांगत आहोत. आम्ही आता ईव्हीएमबद्दल बोलत नाही आहोत, यावर स्वतंत्रपणे चर्चा होईल. ज्या पद्धतीने हे निवडणुका घेतात, जमिनीवर काय घडते, ते आम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे पण ऐकणारे कोणी नाही. ना न्यायालय ऐकतंय ना निवडणूक आयोग आणि हे लोकशाहीबद्दल बोलतात, असे सिब्बल म्हणाले.