
हल्ली बहुतांश तरुणाईला लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि स्लिम होण्यासाठी तरुणाई जिम, योगा क्लासचा आधार घेत आहे. हे सर्व करताना डाएट प्लानकडेही तरुणाई विशेष लक्ष देत आहे. मात्र हेच डाएट प्लान एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. डाएटचा अतिरेक केल्याने उपासमारीमुळे तरुणीचा मृत्यू झाला. केरळच्या कन्नूर जिल्ह्यात ही घटना घडली. श्रीनंदा असे मयत तरुणीचे नाव आहे.
कूथुपरंबा येथील रहिवासी असलेली रहिवासी असलेली श्रीनंदा वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. श्रीनंदाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी तिने जेवण कमी केले आणि अधिक व्यायाम करत होती. तसेच श्रीनंदा ऑनलाईन डाएट प्लानही फॉलो करत होती. या प्लाननुसार श्रीनंदा केवळ द्रव्य पदार्थांचे सेवन करत होती.
अखेर यामुळे उपासमार होऊन तिची प्रकृती खालावली. तिला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला थलासेरी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.