जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांना ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून येण्यास मनाई

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा गडावर ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे परिधान करून आल्यास भाविकांना खंडेबा गडावर प्रवेश दिला जाणार नाही. पुरुष व महिला भाविकांना आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडावर दररोज हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. याशिवाय वर्षाकाठी खंडोबाच्या सात मोठय़ा यात्रा येथे भरतात. यात्रा कालावधीमध्ये तीन ते चार लाख भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत असतात. या दृष्टीने श्री मार्तंड देवस्थानने जेजुरी गडावर वस्त्रसंहिता जपण्यासाठी निर्णय घेतला आहे. आज गडाच्या मार्गावर याबाबतचा सूचना फलक लावण्यात आले.

या वेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मुख्य व्यवस्थापक आशीष बाठे, सतीश घाडगे, विलास बालवडकर, बाल अभिनेता दर्श खेडेकर आदी उपस्थित होते.

मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी फलकाचे उद्घाटन केले. या वेळी ते म्हणाले, येथील पावित्र्य जतन करण्यासाठी खंडोबा देवस्थानने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाविकांना विनंती केली आहे, आपण आपल्या घरी पूजा, मंगल कार्य असल्यावर जसे कपडे परिधान करतो, तसे कपडे परिधान करून गडावर यावे. हा नियम पुरुष व महिला दोघांनाही लागू आहे. गुडघ्यापेक्षा वर असणारे कपडे परिधान करू नयेत. शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पँट, फाटलेल्या जीन्स, हाफ पँट (बर्मुडा) असा पेहराव नको. इतरांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करून गडावर येऊ नये. सध्या आम्ही सर्वांना विनंती करीत आहोत. परंतु त्यातूनही जे नियम मोडतील त्यांच्यावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल़

हिंदुस्थानी संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. जेजुरीच्या खंडोबा गडावर लग्न झाल्यावर पारंपरिक पद्धतीनुसार नवरा-बायकोने जोडीने येण्याची प्रथा आहे. या वेळी विशेष म्हणजे बायकोला कडेवर घेऊन पाच पायऱ्या चढायची परंपरा आजही पाळली जाते. वधू-वरांचे पोशाख आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीला साजेसे असतात. जेजुरीचा खंडोबा गड ऐतिहासिक आहे. त्याचे पावित्र्य टिकले पाहिजे व भाविकांची यात्रा आनंददायी झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे, असे विश्वस्तांनी सांगितले.

तरुण-तरुणींना लगाम बसणार

या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी खंडोबा गडावर देवदर्शनासठी येतात, मात्र अनेक जणांचा पेहराव हा आपल्या संस्कृतीला शोभणारा नसतो. उंच डोंगर असल्यामुळे अनेक पर्यटकही येथे येतात. पर्यटनाबरोबर खंडोबाचे दर्शन त्यांना घडते, मात्र त्यांनासुद्धा आता हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.