
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात वरोरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले. नागपूर चंद्रपूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफी द्यावी, पीक विमा तातडीने द्यावा, नाफेडची सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी, कापूस खरेदी सुरू ठेवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वाहतूक थांबल्यामुळे पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डुकरे यांनी यावेळी दिला.