मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे – उद्धव ठाकरे

आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी (कंत्राटदारांची) भरपूर काही आहे. हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका राज्याच्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणाले आहेत. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, “याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मला आचार्य अत्रे यांची आठवण आली. आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की, गेल्या 10 हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता.अर्थसंकल्पाचं सार काढायचं झालं तर, उद्या सूर्य उगवणार आहे. सर्वांना प्रकाश मिळणार आहे. व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्यातून मिळणार, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या.”

ते म्हणाले, “आमच्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्तीची घोषणा केली नाही तर, घोषणा करून त्यांची अंमलबजावणी केली होती. या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलं होतं की, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. अर्थसंकल्पात कर्जमुक्तीबद्दल काही नाही. लाडक्या बहिणींबद्दल या अर्थसंकल्पात प्रेम दिसलं नाही. मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा ते वाढलं आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या काळातील महायुतीची एक जाहिरात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की, मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, ही ओळख घेऊन आता त्यांनी पुढे जायला हवं. आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं घोषवाक्य झालं आहे.”

हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी (कंत्राटदारांची) भरपूर काही आहे. मुंबईमध्ये 64 हजार 783 कोटींची विकासकामं आहेत, याने कसला आणि कोणाचा विकास होणार आहे. यात फक्त कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार आहे. कारण, आताच मुंबईत काही रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यातच आणखी एक महत्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे मेट्रोने दोन विमानतळं जोडण्याचं काम सरकार करणार आहे. हे काम अदानी यांचं आहे. कारण विमानतळाची कामे आणि जागा जर अदानी यांना दिली असेल तर, हे काम अदानी यांनी केलं पाहिजे, हे सरकारचं काम नाही. उद्या तुम्ही (महायुती सरकार) म्हणाल, अदानी यांना विमानतळाची जागा दिली आहे, त्यावर धावपट्टी बांधून देऊ. केवळ तुम्ही तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामे करत आहेत, त्यातलंच हे एक काम आहे.”