टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली

मध्य प्रदेशमधील महू शहरातील टीम इंडियाच्या विजयानंतर चाहत्यांनी काढलेल्या विजयी रॅलीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हिंसाचारात दोन दुकानांना व दोन गाड्यांना आग लावण्यात आली. शहरातील जामा मशिदीजवळ हा प्रकार घडला.

रविवारी चॅम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाच गडी राखून न्यूझीलंडचा पराभव केला. तब्बल तेरा वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडिया जिंकली आहे. त्यानंतर महू शहरातील काही तरुणांनी विजयी जल्लोष केला व रॅली काढली. या वेळी त्यांनी फटाकेही फोडले. त्या फटाक्यांवरून दोन गटात वाद झाले. त्यानंतर काही लोकं हातात दगड घेऊन आले व त्यांनी रॅली काढणाऱ्या तरुणांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीनंतर काही समाजकंटकांनी दोन गाड्या व दोन दुकानेही जाळली.