
जगातील सर्वात श्रीमंत आणि चर्चेत असणारे उद्योगपती एलोन मस्क ( Elon Musk ) यांच्यासाठी अडचणीचा काळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एलोन मस्क यांची मुख्य कंपनी असलेल्या टेस्ला ( Tesla ) कारच्या विक्रीत प्रचंड घट होत आहे. लोक टेस्ला कार खरेदी करणे टाळत आहेत. त्यासोबतच कार विक्री कमी झाल्यामुळे टेस्लाचे शेअर्स कोसळले आहेत. या वर्षी प्रचंड मोठी घट झाल्याचं दिसत आहे. ही घसरण गुगल आणि एनव्हीडियापेक्षा जास्त आहे. जगातील अनेक देशांमधील एलोन मस्क आणि टेस्ला विरोधात वातावरण तयार झालं आहे. मात्र त्याचवेळी मस्क यांनी हिंदुस्थानातील बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
निव्वळ संपत्ती किती कमी झाली?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, यावर्षी एलोन मस्कच्या संपत्तीत 103 अब्ज डॉलर्स (9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) घट झाली आहे. असं असलं तरीही ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 300 अब्ज डॉलर इतकी आहे. यावर्षी संपत्तीत घट झालेल्यांमध्येही मस्क हेच पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या संपत्तीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची प्रमुख कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण.
जवळपास 30 टक्क्यांची घसरण…
यावर्षी टेस्लाचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. या वर्षी टेस्लाचे शेअर्स जवळपास 30 टक्क्यांनी घसरले आहेत. ही घसरण गुगल आणि एनव्हीडिया सारख्या जगातील मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. या वर्षी गुगलचे शेअर्स सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत आणि एनव्हीडियाचे शेअर्स सुमारे 18 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका महिन्यातच टेस्लाचे शेअर्स सुमारे 25 टक्क्यांनी घसरले आहेत.
लोकांचा मस्क यांच्यावर राग का?
जेव्हापासून मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ आले आहेत, तेव्हापासून लोक स्वत:ला त्यांच्यापासून दूर ठेवू लागले आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांना इतर देशांतील अनेकांनी पसंती दर्शवलेली नाही. याशिवाय, अमेरिकेतली सरकारी नोकऱ्यांमधून कपात करण्याचा मस्क यांचा निर्णय लोकांना आवडत नाहीये. टेस्ला कारच्या विक्रीवर त्यांच्या बदलेल्या प्रतिमेचाही परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः युरोपमध्ये तर काही लोकांनी टेस्ला शोरूम पेटवून देण्यापर्यंत मजल मारली आहे.
हिंदुस्थानात प्रवेश करण्यास उत्सुक
टेस्ला आता हिंदुस्थानात प्रवेश करण्यास सज्ज आहे. हिंदुस्थानची बाजारपेठ मिळाल्यानंतर कंपनीला पुन्हा एकदा बुस्ट मिळेल अशी आशा कंपनीला आहे. मुंबईत एक शोरूम उघडून कंपनी हिंदुस्थानात पाय रोवण्याच्या तयारित असल्याचं बोललं जात आहे.
कंपनीने यासाठी जागाही घेतली आहे. टेस्लाने हिंदुस्थानातही भरती सुरू केल्याचंही कळतं आहे. मात्र अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्यात अद्याप शुल्काबाबत कोणताही करार झालेला नाही. हिंदुस्थानने आयात केलेल्या गाड्यांवरील कर शून्यावर आणावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र हिंदुस्थान अद्याप यासाठी तयार नाही.