जबरदस्त… ‘छावा’ची 500 कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री

अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ने आतापर्यंत भल्या भल्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. एवढेच नव्हे तर ‘छावा’ने 500 कोटींच्या क्लबमध्ये शानदार एण्ट्री घेतली आहे.

14 फेब्रुवारीला ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱया विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अजूनही प्रेक्षक ‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. 23 व्या दिवशीदेखील ‘छावा’ने चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने 23 व्या दिवशी हिंदुस्थानात 16.5 कोटी कमावले. त्यामुळे एकूण कमाईचा आकडा 500 कोटी पलीकडे गेला आहे. आतापर्यंत ‘छावा’ चित्रपटाने हिंदुस्थानात 508.8 कोटींचा गल्ला जमवला आहे.

विकी कौशलच्या आजवरच्या करिअरमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ चित्रपट आहे. विकीच्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाने 244.14 कोटी, ‘राझी’ चित्रपटाने 123.74 कोटी, ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने 93.95 कोटी आणि ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 88.35 कोटी कमावले होते. विकीचा ‘छावा’ चित्रपट पहिला आहे, जो 500 कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे.