एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न ‘जैसे थे’, 993 कोटींची गरज असताना सरकारने दिले फक्त 350 कोटी

एसटीची सेवा सुधारण्याचा निर्धार बोलून दाखवणारे महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या थकीत देणींच्या प्रश्नावर गांभीर्यशून्य आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रॅच्युईटी, बँक कर्ज तसेच इतर देणी थकली असून ही देणी चुकती करण्यासाठी 993 कोटींची गरज आहे. तशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत असताना सरकारने चालू महिन्यात फक्त 350 कोटींचा निधी दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महायुती सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

एसटी महामंडळाला दरमहा सरकारकडून विविध सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम येते. त्यातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. गेले अनेक महिने ही रक्कम अपूर्ण येत आहे. डिसेंबरअखेर महामंडळाकडून सुमारे 3260 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. फेब्रुवारीत महामंडळाला एकूण 993.76 कोटींची गरज असल्याचे सरकारला कळवले होते. असे असताना चालू महिन्यात निधी देताना सरकारने हात आखडता घेतला आणि फक्त 350 कोटी रुपयांचा निधी दिला.

चालू महिन्यात महामंडळाला दिलेली रक्कम मागणीच्या तुलनेत कमी असल्याने कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीतच राहणार आहेत. सरकार कर्मचारी व जनतेची फसवणूक करीत आहे. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस