पुढील तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे पूर्ण, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अंधेरी ते मुंबई विमानतळ या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2026 पर्यंत ही मेट्रो सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. वाहतूककोंडीमुळे मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची होणारी कसरत वाचणार आहे.

विधानसभेत फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची माहिती दिली. 2014 ते 2019 या काळात दहा मेट्रो लाइनला मान्यता दिली. 2026 ते 2027 या तीन वर्षांत मेट्रोचे बहुतांश प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

n वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रोचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. कासारवडवली ते पॅडबरी जंक्शन डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होईल. पॅडबरी जंक्शन ते गांधी नगर मेट्रो डिसेंबर 2026 पर्यंत आणि गांधी नगर ते भक्ती पार्क मेट्रो ही नोव्हेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल.

n कासारवडवली ते गायमुख 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा टप्पा पूर्ण होईल. ठाणे ते भिवंडी टप्पा 1 चे 95 टक्के काम झालेले आहे. मेट्रो सहा स्वामी समर्थ नगर-विक्रोळी-कांजूरमार्गचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही मेट्रो डिसेंबर 26 पर्यंत सुरू होईल. दहिसर ते मीरा-भाईंदर 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2025 मध्ये हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक या मेट्रोचे काम अद्याप सुरू केलेले नाही. कारण त्याच्या परवानग्या अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रो-11 कल्याण ते तळोजा सहा टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.