सीरियात हिंसाचार उफाळला; दोन दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू, लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष असद समर्थकांमध्ये संघर्ष

सीरियात लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. देशातील लताकिया आणि टार्टस या भागांत हिंसाचाराची आग कायम असून या हिंसाचारामुळे 2 दिवसांत तब्बल एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 2011 मध्ये झालेल्या सीरियन यादवी युद्धानंतरचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा आहे. लष्कर आणि असद समर्थकांमध्ये दोन दिवसांपासून चकमक सुरू आहे.

लताकिया शहराच्या आसपासच्या मोठ्या भागात वीज सेवा खंडित करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या गोळीबारात 745 नागरिक ठार झाले, तर 125 सुरक्षा दलाचे सदस्य आणि असद समर्थकांपैकी 148 जण मारले गेले आहेत, अशी माहिती सीरियातील युद्धावर लक्ष ठेवणाऱ्या ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ संस्थेने दिली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल असद यांना सत्तेवरून खाली खेचल्यानंतर बंडखोरांनी देशावर कब्जा केला. असद यांनी देशातून पलायन केल्यानंतर हयात तहरीर अल-शाम या दहशतवादी संघटनेने सीरियातील सत्ता हाती घेतली. आता तीन महिन्यांनंतर नवीन सरकारला आव्हान देण्यासाठी नवीन संघर्ष सुरू झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या संघर्षाने रौद्ररूप धारण केले आहे. सीरिया सरकारच्या म्हणण्यानुसार, माजी राष्ट्राध्यक्ष असद यांच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. त्यामुळे हिंसाचार भडकला. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला असता ही चकमक सुरू झाली.

घरात घुसून गोळीबार

हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांपैकी एक बनियास येथील स्थानिकांनी सांगितले की, रस्त्यावर मृतदेहांचा खच साचला आहे. कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नव्हते. बंदूकधारींनी मृतदेह नेणाऱ्यांनाही संपवण्याची धमकी दिली. 57 वर्षीय अली शेहा म्हणाले की, ‘‘हिंसाचारानंतर मी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झालो, पण माझे 20 सहकारी माझ्यासमोर मारले गेले. घरात आणि दुकानात घुसून गोळीबार केला जात आहे.’’