नीलेश रेमजेने ‘मुंबई श्री’ जिंकली

कोशिश करनेवालो की कभी हार नहीं होती… नीलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. स्पर्धा सोडा, गटविजेतेपद जिंकण्याचे प्रयत्नही नेहमी तोकडे पडत होते. तरीही त्याने कधी हार मानली नाही. स्पर्धा खेळण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. अखेर गेले आठ वर्षे करत असलेली मेहनत मुंबई शरीरसौष्ठवाची खरी शान असलेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत फळास आली आणि प्रथमच ‘मुंबई श्री’च्या मंचावर उतरलेल्या नीलेशने संधीचे सोने केले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिट जिमच्या रेखा शिंदेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली.

मुंबई शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या स्पर्धेत मंचावर उतरते, त्या मानाच्या प्रतिष्ठेचा ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार सोहळा बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने संयुक्तपणे पुन्हा एकदा जोशपूर्ण वातावरण अंधेरीच्या लोखंडवाला गार्डनमध्ये पार पाडला. सार्यांनाच उत्सुकता होती ती ‘मुंबई श्री’चा नवा विजेता कोण असणार आणि या ग्लॅमरस स्पर्धेला नीलेश रेमजेच्या रूपाने नवा कोरा विजेता लाभला.

ही स्पर्धा इतकी थरारक आणि अनपेक्षित होती की, स्पर्धेत खेळणार्या स्पर्धकांसह आणि जजेसनाही विजेता कोण ठरणार याची कल्पना नव्हती. प्रत्येक गटात मोठय़ा संख्येने खेळाडू सहभागी झाल्यामुळे प्रत्येक गटातील अव्वल खेळाडूची निवड करताना जजेसना चांगलाच घाम फुटला. आठ गटांतील अव्वल खेळाडू ‘मुंबई श्री’च्या जेतेपदासाठी पोझिंगला उतरले तेव्हाही विजेत्याचा कुणाला अंदाज नव्हता. तेव्हा नीलेशने गणेश उपाध्याय, संजय प्रजापती, अभिषेक माशेलकर या तगडय़ा स्थितीत असलेल्या खेळाडूंवर मात करत जेतेपदाला मिठी मारली. या मोसमात नीलेश चक्क 16 स्पर्धा खेळला होता आणि फक्त एका स्पर्धेत त्याने गटविजेतेपद मिळवले होते. कोशिश करनेवालो की कभी हार नहीं होती, हे मानणाऱया नीलेशने आपल्या आठ वर्षांच्या शरीरसौष्ठव कारकीर्दीत पहिलेच जेतेपद जिंकले. तेसुद्धा ‘मुंबई श्री.’ याला म्हणतात, छप्पर फाडके यश. तसेच गेली अनेक वर्षे ‘मुंबई श्री’त उतरणाऱ्या गणेश उपाध्यायला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदेला कुणीच आव्हान देऊ शकला नाही. तिने अपेक्षेप्रमाणे ‘मुंबई श्री’वर पुन्हा आपलेच नाव कोरले.

शरीरसौष्ठव संघटनेने वेळ साधली

जे. राय फिटनेस आणि आय. क्यू. फिटनेसचे सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेचा उत्साह खेळाडूंच्या अभूतपूर्व सहभागाने वाढवला. पण या सहभागाला चारचांद लावले संघटनेच्या वक्तशीर आयोजनाने. खेळाडूंच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहाणाऱया संघटनेने खेळाडूंच्या मोठ्या उपस्थितीनंतरही स्पर्धेचे नियोजनबद्ध आणि वेळेत आयोजन केले. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही संघटनेने स्पर्धा चक्क दहाच्या ठोक्याला संपवल्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्याही हृदयाचा ठोका चुकला. या स्पर्धेचे आपल्या ओघवत्या आणि स्फूर्तिदायक शैलीत निवेदन करून राणाप्रताप तिवारी यांनी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींच्याही अंगावर शहारे आणले. स्पर्धेचा पारितोषिक सोहळा माजी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार हारुन खान, मुंबई शरीरसौष्ठवचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तिकर, अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका, सरचिटणीस विशाल परब, सुनील शेगडे यांच्यासह शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गज शाम रहाटे, सागर कातुर्डे, हरमीत सिंग, उमेश गुप्ता आणि विक्रांत देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय झगडे, राजेश निकम, संतोष सावंत, जयदीप पवार यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.