महाराष्ट्राचा दिल्लीवर विजय

ईश्वरी अवासरे (126) व के. एन. मुल्ला (116) यांच्या दणकेबाज शतकांच्या जोरावर महाराष्ट्राने महिलांच्या 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत दिल्लीवर 9 धावांनी विजय मिळविला. या लढतीत तब्बल 619 धावांची लयलूट झाली. शतकी खेळीसह चार विकेट टिपणारी के. एन मुल्ला या विजयाची शिल्पकार ठरली.

चंदिगडमध्ये झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 314 धावसंख्या उभारली. यात ईश्वरी अवासरे (126) व के. एन. मुल्ला यांनी 235 धावांची सलामी दिली. ईश्वरीने 96 चेंडूंत 126 धावा करताना 11 चौकार व 6 षटकारांचा घणाघात केला, तर मुल्लाने 122 चेंडूंत 16 चौकारांसह 116 धावांची खेळी केली. दिल्लीकडून सुमिती सोनीने 3, तर मधू व तनिशा सिंग यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीला 7 बाद 305 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून प्रज्ञा रावत (41), उपेक्षा यादव (88), तनिषा सिंग (79) व दीक्षा (नाबाद 56) यांनी उपयुक्त फलंदाजी केली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. महाराष्ट्राकडून के. एन. मुल्ला हिने सर्वाधिक 4 विकेट टिपले, तर आय. एम. पठारे व ज्ञानेश्वरी पाटील यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या.