नागपाड्यात पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू, एकावर उपचार सुरू

नागपाडामध्ये इमारतीच्या बेसमेंटमधील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पाच कामगारांपैकी चौघा जणांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला तर एकावर भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

नागपाडा येथील मिंट रोड गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ बिस्मिल्लाह स्पेस या 20 मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाण्याची टाकी असून ती स्वच्छ करण्यासाठी एक कामगार आज दुपारी 12.15 च्या सुमाराला टाकीत उतरला, मात्र बराच वेळ तो बाहेर न आल्याने इतर चार कामगार या कामगाराला पाहण्यासाठी आले. पाण्यात टाकीत अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी इतर चौघेही आत उतरले, मात्र टाकीतील विषारी वायूमुळे कामगारांना त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले. बराच वेळ झाल्याने कामगार न परतल्यामुळे काही जण टाकीजवळ आले असता हा प्रकार उघडकीला आला. याची माहिती अग्निशमन दलाला देताच घटनास्थळी पोहोचले आणि टाकीत अडकलेल्या पाचही कामगारांना बाहेर काढले. उपचारासाठी तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचपैकी चार कामगारांचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या चौघा कामगारांचा मृत्यू

हासिपल शेख (19), राजा शेख (20), जियाउल्ला शेख (36) आणि इमांदू शेख (38) या चार कामगारांचा मृत्यू झाला तर पुरहान शेख (31) याच्यावर उपचार सुरू आहेत.