पितळे मारुतीची जागा बदलण्यासाठी बिल्डर पुन्हा हायकोर्टात

गिरगावातील खेतवाडीतील 135 वर्षे जुन्या पितळे मारुतीची जागा बदलण्यासाठी बिल्डरने पुन्हा तातडीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. 9 ते 11 मार्च या कालावधीत मारुतीची मूर्ती हलवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्थ ग्राफिक्स व इतर या विकासकामार्फत ही याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती विकासकामार्फत करण्यात आली. त्यानुसार न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

मारुतीची मूर्ती नवीन मंदिरात हटवण्यासाठी विरोध झाला. पोलिसांना हा विरोध शमवता आला नाही. परिणामी मूर्ती हलवता आली नाही. आता यासाठी नवीन तारखा ठरवण्यात आल्या आहेत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. या तारखांना मूर्ती हलवण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल, अशी हमी परिमंडळ-2 चे उपायुक्त मोहित गर्ग यांनी न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने ही सुनावणी 13 मार्च 2025 पर्यंत तहकूब केली आहे.

स्वयंभू मारुती

ही मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू मूर्ती हलवता येत नाही. मानवाने प्रतिष्ठापना केलेली मूर्ती जागेवरून काढता येते. त्यामुळे स्वयंभू मारुती येथून हलवू नये, अशी विनंती करत येथील खंबाटा लेन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने न्यायालयात अर्ज केला होता. यात कोणतेही अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला होता.